भाग १: आम्ही फटफटी चालवण्याचा निर्णय घेतला
"चला गोव्याला जाऊया!" कॉलेजमधील मित्र आणि कुटुंबियांनी वार्षिक गोवा सहलीची घोषणा केली.
काही म्हणाले: आम्ही विमानाने जाऊ.
काही म्हणाले: आम्ही आगगाडीने येऊ.
काही म्हणाले: आम्ही मोटारीने येऊ.
श्री (माझा मित्र) आणि मी: (आमच्या बायका त्यांच्या आधी ठरलेल्या कामांमुळे येणार नव्हत्या) चला आपल्या रॉयल एनफिल्ड मेटीऑर्स वर जाऊया!
अशा तर्हेने आम्ही फटफटी चालवण्याचा निर्णय घेतला. आणि अनेक गोष्टी सुरू झाल्या. मार्ग शोध, रस्त्यांच्या स्थितीचे संशोधन, रपेटीचे नियोजन, नेण्याचे सामान, वजन वितरण, सुरक्षा पोशाख (अंगत्राण) तपासणे, पावसाची तयारी, प्रवासपूर्व देखभाल आणि बरेच काही. आम्ही आंतरजालावर बरेच लेख, ब्लॉग, अपडेट्स वाचले आणि पुणे-कराड-अणुस्कुरा-राजापूर-गोवा मार्ग पक्का केला.
तयारी जोरात सुरू असतानाच माशी शिंकली- नव्हे, डास चावला!- श्रीला चिकुनगुनिया झाला आणि त्याला भयंकर ताप आला! त्याला रपेट करणे शक्यच नव्हते! मी मात्र, एकल रपेट करून सहल पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.
एकल रपेटीच्या निर्णयामुळे काही गोष्टी बदलल्या. एका दिशेला थेट जाण्याचा मनसुबा सोडून निवासी रपेट करण्याचे ठरवले. मी दोन्ही वेळा कराडला राहायचे ठरवले. त्यामुळे सर्वांना बराच दिलासा मिळाला. एकेरी प्रवासादरम्यान पूर्ण विश्रांतीमुळे कमी थकवा येतो.
वाटून घेतलेल्या जबाबदार्या एकट्यावर आल्या. उदा. आमच्यापैकी एकजण चेन देखभाल साहित्य आणि दुसरा प्रथमोपचार साहित्य घेणार होता. आता एकट्याची रपेट असल्याने मला दोन्ही घ्यायचे होते.
जोड-स्वारी/ गट-स्वारीत आघाडीस्वार-अनुयायी तंत्र खूप उपयोगी पडते. आघाडीस्वार मार्गक्रमण आणि वेगावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतो, तर अनुयायी मागून जाताना थोडे निश्चिंत राहू शकतात. प्रत्येकाला विश्रांती देण्यासाठी फटफटीस्वार गटातील जागा बदलतात. एकल रपेटीत, एकालाच संपूर्ण मार्गावर लक्ष केंद्रित करावे लागते. त्यामुळे ताण आणि थकवा वाढतो.
तो कमी करण्यासाठी मी जास्त वेळा आणि जास्त वेळ विश्रांती घ्यायचे ठरवले. यामुळे माझा ताण बराच कमी झाला. मी विविध गटांवर फोटो आणि व्हिडिओंसह वारंवार आणि निश्चित ठावठिकाणा कळवत राहिलो. यामुळे त्यांनाही हायसे वाटले.
भाग २: सामान बांधणी आणि लादणे:
फटफटीवर सामान लादण्यासाठी अनेक पर्याय आहेत. टाकीवरील पिशव्या, मागे बांधायच्या पिशव्या, खोगीर-पिशव्या, नेहमीची पाठपिशवी, पेट्या आणि बरेच काही...
मी खोगीर-पिशवी वापरली कारण... मी विचार न करता पूर्वीच एक खरेदी केली होती 🙂 पण तो एक चांगला पर्याय ठरला. त्या मागील आसनाच्या दोन्ही बाजूंना बसतात आणि अंगभूत/अतिरिक्त पट्ट्यांसह बांधता येतात. यांना कुलुपकिल्ली नसते. त्यामुळे रात्रीच्या मुक्कामाच्या वेळी त्या काढून बरोबर न्याव्या लागतात.
सामान बांधणे ही एक कौशल्यपूर्ण गोष्ट आहे. फटफटीचा वेग आणि प्रवासादरम्यान समतोल राखण्यासाठी खोगीरपिशवीच्या दोन्ही बाजू सारख्या वजनाच्या असणे आवश्यक आहे. असंतुलित पिशव्यांमुळे गाडीचा तोल जातो आणि त्यामुळे अपघात होऊ शकतात.
कोणत्याही प्रकारचे सामान लादणे आणि काढणे त्रासदायक असते. सामान लादल्यावर, ते पाऊस/धूळरक्षक खोळ, भडकरंगी खोळ आणि/किंवा इलॅस्टिक दोरीने बांधले जातात. त्यामुळे ते उघडणे/बंद करणे देखील त्रासदायक ठरते. आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी जास्तीची पाठपिशवी कामी येते. केबिन/चेक-इन सामानासारख्या संकल्पना इथेही उपयोगी पडतात.
कोणत्या वस्तु कुठे ठेवायच्या याची बरीच उजळणी करून, बराच वेळ देऊन मी बांधाबांध केली तरीही काही चुका केल्याच आणि काही शिकलो पण.
मी काय शिकलो?
1. प्रत्येक संभाव्य परिस्थितीची कल्पना करून बांधलेल्या सामानातील कुठल्या वस्तु कशा, कुठे, किती वेळा लागू शकतील याचा विचार करा. अनेक वेळा लागत असल्यास पाठपिशवीत ठेवा. उदा. रपेटीदरम्यान हवामान सतत बदलत असल्यास, रेन सूट, विंड चीटर, काळे चष्मे पाठपिशवीत ठेवा. चेन देखभाल साहित्य लादसामानात ठेवता येते कारण रपेटी दरम्यान त्याची आवश्यकता नसते.
2. आरसे, मोबाईल/कॅमेरा धारक घट्ट करण्यासाठी पाना/ॲलन की सारख्या पटकन लागणार्या वस्तू पाठपिशवीत ठेवा. इतर वस्तु लादसामानात ठेवा. प्रेशर गेज पाठपिशवीत तर पंक्चर किट लादसामानात ठेवता येते.
2. अर्धा लिटर पाण्याची एक बाटली पाठपिशवीमध्ये आणि ज्यादा पाणी लादसामानात ठेवा.
3. लादसामान जमेल तितके आटोपशीर बांधा. आकार कमी करा पण वजन संतुलित करा.
4. लादसामानाचे खिसे वाटतात तितके सहज उघडता येत नाहीत कारण संपूर्ण सामान पाऊस/धूळरक्षक/भडकरंगी खोळीत गुंडाळलेले असते.
5. गर्दीतून चालवताना तसेच दुचाकी पार्क करताना खोगीरपिशवीमुळे वाढलेल्या रुंदीकडे लक्ष द्या.
भाग ३: प्रवासारंभ!
दिवस १: छोटा पल्ला आणि रात्रीची रपेट!
घरी गणपती विसर्जन उरकून मी संध्याकाळी पुण्याहून निघालो. त्या दिवशीचे गंतव्य ठिकाण होते कराड. खंबाटकी घाटाजवळ येईतो अंधार पडू लागला होता. परंतु, संधिप्रकाशात ठीकठाक घाट चढता आला. ओव्हरटेक नाही, गाडी चालवताना गमजा नाहीत. अतिशय संयमाने, सुरक्षित चालवल्याने कोणताही त्रास न होता घाट पार केला.
सुरुर फाट्यावरचा सोलकढी विश्राम फारच आल्हाददायक होता! त्यानंतर कराडपर्यंतचा सर्व प्रवास रात्रीचा होता. माझ्या अंगत्राणावर आणि सामानावर चांगल्या चमकपट्ट्या आहेत. शिवाय, मीही अंगावर आणि सामानावर जास्तीचे चमकणारे पट्टे घातले होते. सामानाला भडकरंगी खोळ होतीच. गाडीला पटकन नजरेत यावी अशी कितीही सोय केली तरी ती कमीच वाटते.
मला फटफटीच्या दिव्यांचा प्रकाश कमी वाटला. बऱ्याच वेळा, मी पुरेसे अंतर ठेवून इतर वाहनांच्या मागे जात राहिलो. वेग नियंत्रणात ठेवला आणि रात्री ९ वाजेपर्यंत कराडला पोहोचलो. एकांतात वसलेल्या हॉटेलमध्ये पोहोचलो, तेवढ्यात आठवले मला टाकी भरायची आहे आणि काही पैसे काढायला हवेत! पैसे काढण्यासाठी शहरात जा आणि पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जा. तसे करून शेवटी रात्री ९:३० वाजता चेक इन केले.
सामान उतरवा, अंगत्राण काढा, रात्रीचे जेवण करा आणि झोपी जा! रात्रीचे निवांत जेवण करूनही डोके शांत व्हायला वेळ लागतो. ट्रेकिंग/हायकिंगच्या तुलनेत, रपेटीमुळे शरीराला भरपूर NVH (आवाज, कंपने, दगदग) असतात. यामुळे मानसिक थकवा वाढतो त्यामुळे झोपण्यापूर्वी डोके थोडे शांत करावे लागते. त्यात वेळेचाही हिशेब ठेवावा लागतो. झोपायच्या आधी मी खोलीत थोडा वेळ घालवला आणि झोपी गेलो.
उद्या मोठा आणि लांबचा पल्ला असणार होता!
भाग ४:
दिवस २: मोठा पल्ला
सकाळी नेहमीसारखा ५:०० वाजता उठलो. गरम चहा आणि गरम पाण्याने आंघोळ केली की दिवसाची सुरुवात चांगली होते. अंगत्राण घाला, सामान लादा, रपेटीसाठी तय्यार! हॉटेल सोडा, दोनचार फोटो, आणि फटफटफटरर्रर्र.... मी पुढचा पल्ला सुरू केला. सकाळचे थंड हवामान, मंद सूर्यप्रकाश, हलके ढग आणि आजूबाजूला प्रसन्न हिरवाई! गाडी पळवण्यासाठी उत्तम परिस्थिती. मलकापूरला चहा-टोस्टचा छोटा विश्राम घेतला आणि अणुस्कुरा घाटाकडे निघालो. रस्ता इस्त्री केलेल्या कापडासारखा गुळगुळीत होता. आणखी एकदा छायाचित्रणासाठी थांबून मी अणुस्कुरा घाटापाशी पोहोचलो.
पाहतो तर काय! सगळीकडे ढगांची दुलई आणि धुके !!! मी थांबलो, पावसाळी जॅकेट घातले आणि सावधपणे घाट उतरू लागलो. वळणावळणाने जाताजाता लवकरच ढग/धुक्याचे आच्छादन गेले आणि सगळे प्रकाशमान झाले. घाटाची वळणे तीव्र आकडी आहेत आणि उतारही जास्त आहे. काळजीपूर्वक गाडी चालवून पायथ्याच्या गावात पोहोचलो. या ठिकाणानंतर रस्त्यावर बरेच खड्डे पडले आहेत, ते टाळत जाताना माझा वेग कमी झाला आणि हा भाग पार करायला थोडा वेळ लागला. आणखी एक विश्राम आणि निसर्गसेवा करून ओणी गावात पोहोचलो. इथे राष्ट्रीय महामार्ग ६६ (मुंबई-गोवा) लागतो. डावीकडे वळलो आणि राजापूर पर्यंत आलो.
राजापुरात मिसळपाव आणि चहा असा नाश्ता घेतला विश्रांतीही बर्यापैकी झाली! अंगत्राण काढणे खूप आरामदायक वाटते. साध्या खुर्चीवर पाठ टेकून बसणे, पाय जमिनीवर टेकणे, आजूबाजूला मनमोकळे पाहणे, शांत परिसर आणि स्थिर दृश्य हे छोटे छोटे आनंदही अशा विश्रांतीच्या वेळी मोठे वाटतात.
नाश्ता, शरीरधर्म आणि थोडे पाणी पिऊन झाल्यावर मी शर्ट बदलला कारण कोकणची उष्ण, दमट हवा. उरलेली रपेट सुरू केली. आधीची ३ तासांची रपेट आणि अजून ३ तास बाकी. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग होता, पूर्णतः काँक्रिटीकरण केलेला आणि कोणत्याही प्रकारचे अडथळे नसलेला. मी पुरेसा वेग घेतला. कुडाळला 'थम्सप' साठी आणखी एक छोटा विश्राम घेतला. 'Taste the Thunder' while riding the thunder 🙂
अजून तासाभराच्या प्रवासानंतर मी गोवासीमेवर पोहोचलो. प्रथम गोष्टी प्रथम! येथे वेग मर्यादा काटेकोरपणे पाळा! ताशी ५० किमी वेगाने रांगतोय असे वाटले तर, रांगा! थोडे अवघड रस्ते आणि वळण घेतल्यानंतर मी मुक्कामाच्या ठिकाणाजवळ आलो. दुपारचा १:०० वाजला होता आणि मित्र जेवणासाठी आधीच बाहेर पडले होते. त्यांनी पत्ता पाठवला आणि मी थेट तिथे पोहोचलो. मित्रांची गळाभेट झाली आणि घरी कळवले. मी सुमारे ४५० किमी एकल रपेट करून गोव्यात आलो होतो आणि एक स्वप्न पूर्ण झाले होते. खूप गप्पा आणि हसत-खिदळत मस्त जेवण झालं. खोलीत परत आलो. आता दोन दिवस फक्त मजा!!. आम्ही जे ठरवले ते मी साध्य केले, अशा प्रकारे, माझ्या रपेटीचा पहिला भाग संपला.
एकीकडे 'शुभास्ते...' म्हणणारे कुटुंब, दुसरीकडे स्वागत करणारे मित्र आणि वाटेत चांगलं खाणं, रपेट, निसर्गदृश्य आणि मोसम; सुखी जीवनात आणखी काय हवं असतं??
भाग ५:
दिवस ३:
मित्रांसोबत गोव्यात पूर्ण मजा... लिहिण्यासारखं काही नाही... गोव्यात घडतं, ते गोव्यात राहतं 😉
दिवस ४: परतीचा प्रवास, मोठा पल्ला
जड अंतःकरणाने, गोवा आणि मित्रांचा निरोप घेऊन मी सामान बांधायला सुरुवात केली. या वेळी ते पटकन झाले कारण सर्व गोष्टी आधीच योग्य जागी होत्या आणि मागील रपेटीचा अनुभवही होता. मी नाश्ता करून निघायचे आणि सूर्यास्तापूर्वी कराडला पोहोचायचे असे ठरवले होते. पण आम्ही तरणांगणात डुंबत बसलो आणि नाश्त्याऐवजी जवळजवळ जेवणाचीच वेळ आली! मी गाडी बाहेर काढताच उजवा आरसा मोडल्याचे लक्षात आले. आणखी एक नवीन संकट! हे आरसे एका वर्षात निखळतात पण मी जुगाड करून कसेबसे बसवले होते. पण यावेळी एकाने पूर्ण मान टाकली! तेही नेमके परतीच्या प्रवासाआधी. मी ऍक्सेसरीचे दुकान शोधले आणि दोन्ही आरसे बदलले.
गाडीवर सामान लादल्यावर मित्रांना पण एकेक छोटी फेरी मारण्याची लहर आली. प्रत्येकाची बायकोमुलींबरोबर एकेक फेरी झाली त्यात अर्धा तास गेला.
शेवटी, मी दुपारी २:०० वाजता निघालो. पावसाळी जाकीटाशिवाय निघालो. बांद्यात पोहोचताच मुसळधार पाऊस सुरू झाला. थांबलो, जाकीट घातलं आणि पुढे निघालो. माझे हातमोजे आणि बूट ओले झाले. पाऊस अधून मधून पडत असल्याने मला दरवेळी काढणे घालणे शक्य नव्हते, राजापूरपर्यंत तसाच गेलो. वडापाव आणि चहा घेऊन छोटासा विश्राम घेतला आणि पुढे अणुस्कुराच्या दिशेने निघालो. या वेळी अंधारात घाट चढावा लागेल अशी मला भिती वाटत होती. पटकन टाकी भरली आणि जमेल तितक्या लवकर अणुस्कुराकडे निघालो.
अतिशय शांत परिसर, रहदारी नाही, पाऊस नाही अशा वातावरणात मी अणुस्कुरा घाट चढून आलो तेव्हा सूर्य अजून मावळायचा होता. परतीच्या प्रवासातला तो सर्वात आनंददायी क्षण होता. मला हायसे वाटले. थोडा विश्राम, आणि कराडकडे निघालो. आता संधिप्रकाश होता आणि काळोख पडू लागला होता.
मलकापूरला पोहोचलो तोपर्यंत पूर्ण अंधार पडला होता. उत्तम दर्जाच्या रस्त्यामुळे विशेष कष्ट पडले नाहीत. मी पुन्हा काही वाहनांच्या मागोमाग गेलो आणि २+ तास गाडी चालवत राहिलो. अंधारात गाडी चालवणे म्हणजे डोळ्यांसोबतच मनावरही ताण पडतो. दिवसाचे लख्ख, चौफेर दृश्य आणि रात्रीचे अतिशय संकुचित, गडद, व्यतिरेकी दृश्य यात फार फरक आहे. पूर्ण एकाग्रता आणि अतिरिक्त काळजी घेत जात राहिलो. पुन्हा एकदा गाडीच्या दिव्यांची कमतरता जाणवली.
रात्री ९ वाजता पुन्हा कराडला पोहोचलो. या वेळी पैसे आणि पेट्रोलची गरज नव्हती कारण माझ्याकडे आधीच पुरेशी रोकड होती आणि दुसऱ्या दिवशी टाकी भरता आली असती. दुसऱ्या दिवशी न्याहारी करून निघण्याचे ठरवून, मी निवांत रात्रीचे जेवण केले, खोलीवर विनासायास झोपी गेलो. ही खूप शांत आणि तणावमुक्त झोप होती कारण मला बराचसा प्रवास पूर्ण केल्याचे समाधान मिळाले, उर्वरित कराड-पुणे मार्ग त्यामानाने ओळखीचा होता आणि प्रवास दिवसाचा होता.
भाग ६:
पाचवा दिवस: घरी पोहोचलो
नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता उठलो आणि हळूहळू तयार झालो. हॉटेलमध्ये चांगला नाश्ता केला आणि उरलेल्या रपेटीसाठी सज्ज झालो. ओले मोजे आणि बूट घालणे हा सर्वात किळसवाणा भाग होता, परंतु त्याला पर्याय नव्हता. सामान लादले, टाकी भरली आणि परत निघालो. मंद सूर्यप्रकाश होता त्यामुळे घाम येत नव्हता. काळा चष्मा देखील लागला नाही. अनंत चतुर्दशीची सुट्टी असल्याने वाहतूक कमी होती. एक छोटी विश्रांती घेऊन सकाळी ११ वाजता पुण्यात पोहोचलो. सर्व सामान, थकलेले शरीर, ताजेतवाने मन, यशस्वी स्वारी आणि अनेक आठवणी घेऊन घरी पोहोचलो 🙂
यावेळी एकीकडे निरोप देणारे मित्र, दुसरीकडे स्वागतोत्सुक कुटुंब होते आणि यांसह आनंदी जीवनात आणखी एक संस्मरणीय रपेटीचा अनुभव होता 🙂
माझा मित्र श्रीची कमी सतत जाणवली. त्याच्याबरोबर अजून एक, अशीच फटफटी-स्वारी लवकरच करण्याचे ठरले आहे.
या स्वारीमध्ये काय नव्हते? - देवकृपेने - कोणतेही अपयश, बिघाड, अपघात नव्हते. प्रत्येक स्वारी निर्दोष असेल असे नाही, परंतु गाडीची योग्य देखभाल, काळजी आणि अतिशय उच्च भान, लक्ष, एकाग्रता आणि चालकाची जागरूकता यामुळे स्वारी निर्दोष होण्याची शक्यता खूप वाढते.
--लेखनसीमा--
आशा आहे की तुम्हाला मालिका आवडली असेल. या मालिकेने मला अनुभव पुन्हा जगण्याची संधी दिली आणि पुन्हा दुसऱ्या स्वारीवर जाण्याची प्रेरणा दिली!
Very nice written. प्रवास वर्णन वाचून फार आनंद झाला. फारच सुरेख प्रवास वर्णन लिहिले आहे.
ReplyDelete