भाग १: आम्ही फटफटी चालवण्याचा निर्णय घेतला "चला गोव्याला जाऊया!" कॉलेजमधील मित्र आणि कुटुंबियांनी वार्षिक गोवा सहलीची घोषणा केली. काही म्हणाले: आम्ही विमानाने जाऊ. काही म्हणाले: आम्ही आगगाडीने येऊ. काही म्हणाले: आम्ही मोटारीने येऊ. श्री (माझा मित्र) आणि मी: (आमच्या बायका त्यांच्या आधी ठरलेल्या कामांमुळे येणार नव्हत्या) चला आपल्या रॉयल एनफिल्ड मेटीऑर्स वर जाऊया! अशा तर्हेने आम्ही फटफटी चालवण्याचा निर्णय घेतला. आणि अनेक गोष्टी सुरू झाल्या. मार्ग शोध, रस्त्यांच्या स्थितीचे संशोधन, रपेटीचे नियोजन, नेण्याचे सामान, वजन वितरण, सुरक्षा पोशाख (अंगत्राण) तपासणे, पावसाची तयारी, प्रवासपूर्व देखभाल आणि बरेच काही. आम्ही आंतरजालावर बरेच लेख, ब्लॉग, अपडेट्स वाचले आणि पुणे-कराड-अणुस्कुरा-राजापूर-गोवा मार्ग पक्का केला. तयारी जोरात सुरू असतानाच माशी शिंकली- नव्हे, डास चावला!- श्रीला चिकुनगुनिया झाला आणि त्याला भयंकर ताप आला! त्याला रपेट करणे शक्यच नव्हते! मी मात्र, एकल रपेट करून सहल पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. एकल रपेटीच्या निर्णयामुळे काही गोष्टी बदलल्या . एका दिशेला थेट जाण्याचा मनसुबा सो...